सोमवार, २१ मार्च, २०११

बिस्मिल्ला


काही माणसं जन्मजात दैवी देणगी घेऊन आलेले असतात. त्यांना न काळाचे बंधन असते न कशाचे. पत्रकारितेमुळे अशा काही माणसांना भेटण्याची, त्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. बाबा आमटे असोत कि गुलाम अली, ग्रेस असोत की पाडगावकर, पंडित भीमसेन जोशी असोत की उस्ताद बिस्मिल्ला खान...त्यांचे आपापल्या क्षेत्रातले उत्तुंगपण आणि साधेपणा मला खूपच भावला.
आज २१ मार्च. उस्ताद बिस्मिल्ला खान यांची जयंती. अनेकदा सुरु करून बंद पडलेला ब्लॉग पुन्हा सुरु करायला म्हणजेच त्या ब्लॉगचा नव्याने 'बिस्मिल्ला' करायला त्यांच्यावरच लिहावे वाटले.
....
२००५ सरत आले होते. नोव्हेंबर- डिसेंबर म्हणजे सांस्कृतिक महिना. वेरूळ महोत्सव सुरु झाला होता. आवक-जावक, अनुशेष, निधी, निरंक, व्यपगत अशा रुक्ष भाषेत बोलणाऱ्या महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांकडे आयोजनाची जबाबदारी होती. तेव्हाचे उपायुक्त आणि आताचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक सचिव दिलीप शिंदे यांच्याकडे सारा जिम्मा सोपवून महसूल खाते निर्धास्त झाले. त्या वर्षीचे आकर्षण होते उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे सनई वादन.
कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी दिलीप शिंदेंना फोन केला, म्हटले आम्हाला उस्ताद्जींना भेटायचं...सकाळी सांगतो असे उत्तर देत त्यांनी फोन ठेवला. थोड्या वेळाने दिलीप शिन्देंचाच परत फोन आला, म्हणाले सकाळी १० वाजता या, उस्ताद्जींचा मूड असेल तर भेट आणि बोलणे होईल.
....
२४ नोव्हेंबर २००५.
सकाळी १० लाच सुभेदारी गेस्ट हाउसला पोहोचलो. अर्ध्या तासानंतर तो भेटीचा योग आला.
टिपिकल सरकारी गेस्ट हाउस ते. आत गेलो. पांढरी शुभ्र चादर अंथरलेल्या डबल बेड वर उस्तादजी बसले होते. पंधरा शुभ्र कुर्ता- पायजमा, आतून स्वेटर, डोक्यावर टोपी. शेजारी उशीवर त्यांची सनई ठेवलेली. तिची साफसफाई चालली होती बहुतेक. मी पाहत होतो त्यांच्याकडे. हलक्याशा दाढी-मिशा, गोरापान रंग आणि प्रचंड बोलके डोळे. बोलता बोलता सनई वरून अधून मधून हात फिरत होता.
अनंत प्रश्नांच्या दुष्टचक्रात साधे हसू गमावून बसलेल्या करोडो लोकांच्या आयुष्यात हा माणूस मंगल सुरांचा शिडकावा करतो, हात भर लांबीच्या त्या वाड्यात या माणसाची फुंकर पोहोचली की जादू होते. गेली कित्येक दशके या माणसाच्या कलावती, तोडी, भीमपलासच्या सुरांच्या सोबतीने लाखो करोडो लोकांनी सात फेरे घेतले, घरी-दारी कुठेही या माणसाच्या सनईच्या सुरांनी नव्याचा प्रारंभ करून दिलाय. ओळख न पाळख पण लाखो करोडो लोकांच्या घरच्या कार्याला हा माणूस त्याच्या सनई च्या माध्यमातून आवर्जून हजर राहिलाय.
....
औपचारिक बोलणे सुरु होते. मी मात्र त्यांच्याकडे पाहत बसलो. ८९ वय होते तेव्हा त्यांचे. या वयात म्हातारी माणसे जशी खूप बोलतात तसेच उस्ताजींचे पण बोलणे सुरु होते. संगीत, नवे-जुने प्रसंग, आठवणी असे सुरु असताना त्यांची गाडी रंगात आली.
तुमच्यासाठी संगीत म्हणजे काय आहे? या प्रश्नावर त्यांनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक होते. ते म्हणाले,'' सूर माझा श्वास आहे, सूर अल्ला आहे, सूर भगवान आहे. सूर महाराज नसते मी कोण झालो असतो?"
तुम्ही एवढे कसे काय करू शकलात? यावर त्या ऋषीसमान म्हाताऱ्याने आकाशाकडे बोट दाखवत म्हटले, " मी कौन हु करनेवाला. उसने मुझसे करवा लिया. जबतक सांस चलेगी, सूर महाराज की सेवा करता रहूंगा."
....
आता कुठेही सनई चे सूर कानी पडले की आठवतो हा प्रसंग.