मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०११

जाने वो कौनसे देस जहाँ तुम चले गए...

सकाळीच ती अशुभ बातमी धडकली. एसएमएस आला ‘जगजितसिंग नो मोअर’. येणाºयाला कधी ना कधी जावेच लागते; पण काही माणसांनी कधीच जाऊ नये असे वाटत राहते. त्यातलाच जगजित एक. 23-24 वर्षांपूर्वीची गोष्ट. मित्राकडून कॅसेट घेऊन आलो. आॅगस्टचा महिना. झिम्माड पाऊस सुरू होता. त्या कॅसेटमधला जगजित गात होता. ‘गुलशन की फकत फुलोंसे नही काँटोसे भी झीनत होती है’. त्या दिवशी जगजित आयुष्यात आला तो कायमसाठीच. मग दिवसागणिक हा माणूस जवळ येत गेला. आत कुठेतरी सामावत गेला....
गझल मे बंदिशो अल्फाजही नही काफी
जिगर का खून भी चाहिए कुछ असर के लिए
हा शेर जगजितच्या गायकीने सिद्ध केला. हळुवार, तलम, झुळकीसारखा आवाज. गायकीवरची हुकूमत दाखवण्याऐवजी शब्दांना महत्त्व देत जगजित गायचा. साध्या सोप्या, गुणगुणता येणाºया गझला पाहता पाहता गारुड करून गेल्या. ते आजवर कायम आहे. रुहानी आणि इश्किया या प्रकारांत मोडणाºया गझलचे अनेक प्रकार त्याने लीलया साकारले. सादर केले. सर्वांनी ते डोक्यावरही घेतले; पण त्यात सर्वांत महत्त्वाचा होता तो दर्द, व्याकूळता. बशर नवाज म्हणतात तशी एक कशीश होती त्यात. जुना जगजित आणि नवा जगजित असे त्याच्या कारकीर्दीचे दोन भाग करता येतात. जुना जगजित रोमँटिक मूडमध्ये जास्त रमायचा. इश्क, प्यार, होंठ, आँखे आणि मुहब्बत असे सारे गुलजार विषय असलेल्या गझलांनी तरुणांना रोमँटिक बनवले, म्हाताºयांना जुने दिवस आठवायला भाग पाडले. ‘कल चौदहवी की रात थी, शब भर रहा चर्चा तेरा’, ‘सरकती जाए है रुख से नकाब आहिस्ता आहिस्ता’ यांसारख्या रोमँटिक गझला असतील किंवा ‘चिरागो आफताब गुम बडी हसीन रात थी’ सारखी शारीर प्रेमाचे वर्णन करणारी गझल असो जगजित त्या गुलाबी गझला तब्येतीत रंगवत गेला. काही वर्षांपूर्वी जगजितसिंगच्या मुलाचे विवेकचे अपघाती निधन झाले. या धक्क्याने त्याला पुरते उद्ध्वस्त केले. त्याचा मूड गमगीन बनला. तो नंतरच्या काळात त्याच्या गझलांतून प्रखरपणे जाणवला. ‘जीते रहने की सजा दे जिंदगी ऐ जिंदगी, अब तो मरने की दुआ दे जिंदगी ऐ जिंदगी’ अशी याचना तो आपल्या व्याकूळ स्वरांतून करू लागला तेव्हा नकळत डोळ्यांचे बांध फुटले. ‘गम बढे आते है कातील की निगाहों की तरह’ सारख्या गझलेतून तो दु:खाची आळवणी करत राहिला.‘तुम नही, गम नही, शराब नही, ऐसी तनहाई का जवाब नही’ म्हणत तो आपल्या एकलेपणाचे शल्य त्याच्या चाहत्यांना ऐकवू लागला.
जगजितच्या गझलांमध्ये नव्या काळाचे चित्रही दिसत होते. इश्कात आणि दु:खात अडकलेल्या गझलेत त्याने आजचा काळ आणला. कल्पनाविश्वाच्या बाहेर येत त्याने निदा फाजलीच्या काही वास्तववादी गझला सादर केल्या. ‘अब मै राशन की कतारों मे खडा हूँ’ किंवा ‘हर तरफ हर जगह बेशुमार आदमी, फिरभी तनहाइयोेंका शिकार आदमी’सारख्या त्याच्या रचना नव्या पिढीच्या नव्या दु:खाला वाचा फोडणाºया होत्या.
जगजितच्या गझलांवर किती लिहावे तरी कमीच. लोकप्रिय गझला तर आहेतच; पण चित्रपटांतल्या गझलाही तेवढ्याच ताकदीच्या आहेत. ‘अर्थ’, ‘साथ साथ’पासून तर तहकीकात, सरफरोश, दुश्मन यांसारख्या चित्रपटांतील गझलाही तेवढ्याच ताकदीच्या आहेत. भजने असोत की पंजाबी गीते, जुन्या लोकप्रिय गाजलेल्या चित्रपटगीतांची ‘क्लोज टू माय हार्ट’सारखा खजिना की ‘बाबुल मोरा नैहर छुटो जाए’ सारखी अजरामर क्लासिक भैरवी असेल, जगजित सगळीकडे सहजतेने वावरला आणि आपला ठसा ठेवून गेला. आता फक्त त्या आठवणी जागवत राहण्याशिवाय हाती काय आहे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा