सोमवार, ३१ डिसेंबर, २०१२

थरारक पायपीट


वाळवंट पावला पावलाला परीक्षा पाहात होते. 40-45 दिवस झाले होते. सुरुवातीचा उत्साह कमी होऊन आता शारिरिक - मानसिक ताकदीची सत्त्वपरीक्षा सुरु झाली होती. चालणे भाग होते पण आता त्यासाठी मोटिव्हेशन शोधावे लागत होते. ध्येय गाठायला निघालो, बरेच जवळ आलो पण आता पुढे जाण्यासाठी मानसिक बळ हवे होते. आमच्यातला प्रत्येक जण असेच मोटिव्हेशन शोधत होता. त्यावेळी मला कुठलेही यश, कौतुक याचे मोटिव्हेशन कामाला आले नाही. घरी पोहचल्यावर आईच्या हातची वरणफळे आणि मटार पोहे खायचे आहेत हेच ठरवून मी चालत राहिले. 51 वा दिवस आला आणि आमची मोहिम ठरल्याठिकाणी यशस्वीपणे पूर्ण झाली. ही कहाणी सांगत होती सध्या पुण्यात राहाणारी पण मूळची पैठण तालुक्यातील कडेठाणची सुचेता कडेठाणकर.
गेल्या वर्षी चीनच्या उत्तरेला असलेल्या मंगोलियातील गोबीचे अथांग वाळवंट पायी पार करण्याची एक आंतरराष्ट्रीय मोहीम हाती घेण्यात आली होती.त्यात सुचेता सहभागी झाली होती. 1800 किलोमिटरची ही खºया अर्थाने पायपीटहोती. या मोहिमेत 13 जण सहभागी झाले होते. पण मानवी जिद्द, ताकदीची कसोटी पाहणाºया या प्रवासात सहा जण गळाले, उरलेल्या सात जणांत सुचेता होती. तिने इतर सहकाºयांसोबत ही बिकट मोहिम पूर्ण करण्यात यश मिळवलेच.
आपल्या मूळ गावाला भेट देण्यासाठी आलेल्या सुचेताशी गप्पा मारण्याचा योग आला. त्या गप्पांमध्ये तिने सफरीचे थरारक अनुभव सांगितले. माणसाने कितीही प्रगती केली तरी निसर्गाने घेतलेल्या कठोर परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तेवढीच मेहनत घ्यावी लागते. आपल्यातील अनेक गुणांचा, स्वत:बद्दलच्या कल्पनांचा शोध अशा बिकट स्थितीत लागतो, असे तिने सांगितले.

पुण्याच्या सिमँटेक या सॉफ्टवेअर कंपनीत टेक्नीकल रायटर म्हणून काम करणाºया सुचेताला ट्रेकिंग, गिर्यारोहणाची आवड आहे. सह्याद्रीच्या रांगा तिने पालथ्या घातल्या आहेत. हिमालयातील दºयाखोºयांतही तिने भटकंती केली आहे. तरीही आपल्या नेहमीच्या कोषातील जगण्यापेक्षा सत्त्वपरीक्षा पाहणारे साहस करावे, अशी इच्छा होतीच. तशातच इंटरनेटवर अशा साहसी मोहिमांची आयोजन करणाºया वेबसाईटवर गोबीच्या वाळवंट पायी पार करण्याच्या मोहिमेची माहिती वाचण्यात आली आणि तिने आयोजकांशी संपर्क साधला. तिची निवड झाली. वाळवंटात पाठीवर ओझे घेऊन चालण्याच्या सराव व्हावा यासाठी तिने सरावही सुरु केला.

2011च्या मे महिन्यात मंगोलियातील बुल्गन येथून या 51 दिवसांच्या मोहिमेला प्रारंभ झाला. पूर्वेकडील सेनशँग येथे मोहिमेचा समारोप होणार होता. या मोहिमेत सुचेतासह एकूण 13 जण सहभागी झाले होते. त्यात 7 मुली होत्या. हाँगकाँग, सिंगापूर, आॅस्ट्रेलिया, डेन्मार्क, नेदरलँड, इंग्लंड, कझाकिस्तान, भारत या देशांतील साहसवीरांची ही टीम रवाना झाली. सुचेता म्हणाली की, आपण आपल्या कोषात, कम्फर्ट झोनमध्ये असतो तेव्हा आपली ताकद नाही कळू शकत. अनोळखी माणसांसोबत शारिरिक आणि मानसिक कस पाहणाºया मोहिमेत आपण किती तग धरू शकू असा प्रश्नही मनात होता.

रोेज सरासरी 40 किमी
मंगोलियातील गोबीचे वाळवंट आशियातील सर्वात मोठे वाळवंट आहे. तिथले हवामानही अगदी टोकाचे. दिवसा 50 अंशांच्या आसपास तर रात्री 4 अंशांपेक्षाही खाली जाणारे तापमान होते. तिथला दिवस 16 तासांचा आणि रात्र 8 तासांची. सोबतीला 12 उंट त्यावर तंबू, सामानसुमान लादलेले, पिण्यासाठी पाणी. हे उंटही प्रत्येकाने आळीपाळीने सांभाळायचे. चार-चार उंट एकाने सांभाळायचे. पाठीवर सॅक. अशा स्थितीत या टीमची वाटचाल सुरु झाली. चारही बाजूला फक्त वाळवंट. सकाळी चालणे सुरु केले की दुपारच्या जेवणाची वेळ होईपर्यंत चालत राहायचे. त्यानंतर थोडा आराम करून रात्रीच्या मुक्कामापर्यंत पोहचायचे. तंबू टाकायचे आणि थांबायचे. रोज सरासरी 40 किमी अंतर पार करीत मोहिम सुरु झाली.

वाळवंटातील तापमान शरीरातील सगळी ऊर्जा शोषून घेते. त्यातून मग दुखापती, इजा व्हायला सुरुवात झाली. मनाचा खंबीरपणा कमी होत गेला. अमेरिकेच्या अँड्रीआ नावाच्या मुलीला गँगरीन झाले. इतर काही जणांनाही त्रास होऊ लागला. एक एक करीत मग मोहिमेतील सहा जणांनी माघार घेतली. पण बाकीचे चालतच राहिले. सुचेता म्हणाली की, या मोहिमेदरम्यान अनेक थरारक अनुभव आले. आपण आपल्याला कितीही ताकदवान समजत असलो तरी निसर्गासमोर आपली ताकद दाखवू शकत नाही, हे समजले.

माणूस दिसणे दुर्मिळ
स्थानिक मंगोलियनांचा कसा अनुभव होता हे सांगताना सुचेता म्हणाली की, या वाळवंटात मनुष्य वस्ती नाहीच. संपूर्ण प्रवासात तीन चार वेळाच लोकवस्ती दिसली. त्या सगळ्या भटक्यांच्या वस्त्या. खुरट्या गवतावर मेंढ्यांचे कळप चारून राहाणारे हे भटके. दोनचार घरांच्या वस्त्या असायच्या. आमच्यासोबत कझाकिस्तानचा अ‍ॅगी नावाचा मुलगा होता. तो त्यांच्याशी संवाद साधू शकायचा. या स्थानिकांना आम्ही हा उपद्व्याप का करीत आहोत असा प्रश्न पडायचा. अगत्याने ते आमचे स्वागत करायचे. खाऊ पिऊ घालायचे. उंट, मेंढ्या, घोड्याच्या दुधाचे पदार्थ खूप असत.

खांदा निखळला
या मोहिमेतील थरारक अनुभव सांगताना सुचेता म्हणाली की, एकदा उंट सांभाळण्याची जबाबदारी माझी होती. चालता अचानक एक उंटाने मला लाथ मारली. ती इतकी जोरदार होती की मी दोन तीन फूट उंच उडाले. डाव्या   खांद्याला मार लागला. खूप वेदना होत होत्या. काही दिवसांनी त्या वेदनाही थांबल्या. परत आल्यावर तपासणी केल्यावर कळाले की खांदा निखळला होता. अशाही स्थितीत मी ही मोहिम पूर्ण केली. आजही मला त्या उंटाने लाथ का मारली याचे गूढ कळालेले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा