रविवार, १ जानेवारी, २०१७

‘ख़बर-ए-तहय्युर-ए-इश्‍क़ सुन....’ आणि बिस्मील्लाह....

 फेसबुकवर फक्त शेर शेअर करण्याचा आनंद घेतला. आता जरा आवडत्या गझलांवर, गझलकारांवर लिहायचं ठरवलंय. संकल्प वगैरे म्हणणार नाही याला.... तर दर रविवारी गझलवर लिहीत जाईन. गोड मानून घ्याल ही अपेक्षा

....

ख़बर-ए-तहय्युर-ए-इश्‍क़ सुन....’ आणि बिस्मील्लाह....

....
सिराज औरंगाबादी
औरंगाबादेत काला दरवाजाच्या मागं पंचकुँवा कुवाँ कब्रस्तान आहे. त्या कब्रस्तानात औरंगाबादनं उर्दूला दिलेले दोन शायर चिरविश्रांती घेत आहेत. त्यात एक मकबरा आहे सिराज औरंगाबादीचा आणि सिराजच्या शेजारी म्हणजे उजव्या हाताला गतवर्षी काळाच्या गझलेत सामील झालेले बशर नवाज विसावले आहेत. दुपारी चार वाजेच्या सुमारास सिराज औरंगाबादींची मजार पाहिली. गच्च झाडी असलेल्या कब्रस्तानात नेमकं सिराजच्या शेजारचं मोठं झाड वठून गेलंय. उर्दूच्या आजच्या अवस्थेचं ते प्रतिक आहे असं वाटलं. पण सिराज आणि बशर नवाज यांच्या सानिध्यात त्याला कदाचित नवीन पालवीही फुटेल. 



११ मार्च १७१२ मध्ये सिराज औरंगाबादींचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव सिराजुद्दीन औरंगाबादी. आतापर्यत फारसीच्या अंगानं उच्चभ्रूंपुरती राहिलेल्या उर्दूला आम आदमीची भाषा बनवण्यात औरंगाबादच्याच वली औरंगाबादींचं योगदान वादातीत आहे. त्यांच्या नंतरच्या काळात दख्खननं उर्दूला सिराज दिला. सिराजचा अर्थ जग उजळवून टाकणाऱ्या प्रकाशाचा स्रोत. १७१२ ते १७६३ असं ५१ वर्षांचं आयुष्य लाभलेला हा शायर सुफीयतकडे वळला आणि सुफी बनला. आयुष्याचा खरा अर्थ काय हे शोधण्यात त्यानं जिंदगी घालवली. आयुष्याचा हाच शाेध त्यानं आपल्या शायरीतूनही घेतला. आत्मज्ञानाचं हे संचित त्या काळात जगासमोर मांडताना त्यांनी ते प्रेम आणि प्रणयाची सोपी भाषा वापरत शायरीतून लिहीलं. ‘सिराज ए सुखन’ नावानं त्यांचा दीवान आहे. त्यातल्या गझल वाचताना त्यातल्या इश्क, माशुकच्या पलिकडचं अध्यात्म वाचता वाचता आणि ऐकता ऐकता मनात झिरपत राहातं. 
सिराज औरंगाबादीची ‘ख़बर-ए-तहय्युर-ए-इश्‍क़ सुन’ ही गझल वाचताना आणि ऐकताना गझलमधून तत्त्वज्ञान कसं सोपं करून सांगता येतं हे जाणवतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती जितक्या वेळा ऐकाल तितक्या प्रमाणात ते उलगडत जातं....
सिराजच्या या गझलेतला इश्क परमेश्वराच्या आराधनेचा आहे. तो म्हणतो, ‘तुम्हाला प्रेमाचं चमत्कारिक, थक्क करणारं रुप सांगतो, आता ते या पातळीच्याही पुढं गेलं आहे की आता तो प्रेमाचा उन्माद राहीला नाही आणि भौतिक रुपातली  लुभावणारी,मोहात पाडणारी परी राहीली नाही.... हा इश्क आता एवढा परिसीमेला पोहचला आहे की मला मोहात पाडणारा ‘तू’ राहिला नाहीस आणि तुझ्यामुळं माझ्यात तयार झालेला इगो म्हणजे ‘मी’ पण आता राहिला नाही. आता फक्त एक आगळी बेखबरी राहीलीय....’ तर या मतल्यानं सुरु होणारी ही गझल पुढच्या प्रत्येक शेरमधून आत्मशोधाचं गूढ उलगडत जातात.... 
ही गझल अनेक गायकांना आकर्षित करते. उर्दूतल्या नितांत सुंदर गझलांत या गझलचा क्रमांक वरचा लागतो. मला सगळ्यात चांगलं आणि त्या गझलच्या भावार्थाशी जुळणारं व्हर्जन वाटतं ते आबिदा परवनीनं गायलेलं. तिच्या गझलची लिंकही सोबत दिलीय. 

....

खाली सगळी गझल दिलीय. वाचूनही तिचा आनंद घेऊ शकता....

ख़बर-ए-तहय्युर-ए-इश्‍क़ सुन न जुनूँ रहा न परी रही 
न तो तू रहा न तो मैं रहा जो रही सो बे-ख़बरी रही 

शह-ए-बे-ख़ुदी ने अता किया मुझे अब लिबास-ए-बरहनगी 
न ख़िरद की बख़िया-गरी रही न जुनूँ की पर्दा-दरी रही 

चली सम्त-ए-ग़ैब सीं क्या हवा कि चमन ज़ुहूर का जल गया 
मगर एक शाख़-ए-निहाल-ए-ग़म जिसे दिल कहो सो हरी रही 

नज़र-ए-तग़ाफुल-ए-यार का गिला किस ज़बाँ सीं बयाँ करूँ 
कि शराब-ए-सद-क़दह-ए-आरज़ू ख़म-ए-दिल में थी सो भरी रही 

वो अजब घड़ी थी मैं जिस घड़ी लिया दर्स नुस्ख़ा-ए-इश्‍क़ का 
कि किताब अक्ल की ताक़ में जूँ धरी थी त्यूँ ही धरी रही 

तिरे जोश-ए-हैरत-ए-हुस्न का असर इस क़दर सीं यहाँ हुआ 
कि न आइने में रही जिला न परी कूँ जलवा-गरी रही  

किया ख़ाक आतिश-ए-इश्‍क़ ने दिल-ए-बे-नवा-ए-‘सिराज’ कूँ 
न ख़तर रहा न हज़र रहा मगर एक बे-ख़तरी रही
................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा